महायुतीतच नेत्यांची फोडाफोडी! माजी आ.नितीन पाटील राष्ट्रवादीत

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतील घटक असलेल्या शिंदे गटालाच मोठा धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडचे शिंदे गटाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे महायुतीतच आजी-माजी आमदारांची फोडाफोडी सुरु झाल्याची चर्चा आहे.
ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू नेते म्हणून नितीन पाटील यांची ओळख आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार यांची ताकद वाढली आहे. दुसरीकडे एका दिग्गज नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे शिंदे गटाचे काही नेते आणि पदाधिकारी नाराज झाले. नितीन पाटील यांना राष्ट्रवादीकडून विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.