माजी परराष्ट्र मंत्री काँग्रेसचे के. नटवर सिंह यांचे निधन

नवी दिल्ली – माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंह यांचे काल रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुग्राम इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. के. नटवर सिंह यांनी २००४-०५ दरम्यान मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले.

नटवर सिंह हे १९६६ ते १९७१ या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयात कार्यरत होते. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात जन्मलेले कुंवर नटवर सिंह हे राजघराण्यातील होते. लंडनच्या केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले होते. ते पाकिस्तान, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे राजदूत होते.