नवी दिल्ली – नवी दिल्ली व परिसरातील हवेची गुणवत्ता कायम चिंतेचा विषय असतांनाच दिल्लीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. गेल्या सलग २१ दिवसांपासून दिल्लीच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक राहिली आहे.दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून तुरळक पाऊस येत असून त्यामुळे हवेतील धुळीचे कण खाली बसले आहेत. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या २१ दिवसांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८८ राहिला. ८ ऑगस्ट रोजी सर्वात सुरक्षित हवा नोंदवली गेली. यावेळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५३ अंक नोंदवला गेला. सध्याच्या काळात दिल्लीचे किमान तापमान २७ अंश सेल्सिअस असल्यानेही गुणवत्तेत सुधारणा झाली. गेल्या वर्षभरातून केवळ १३ दिवसच चांगली हवा नोंदवली गेली. राजधानी दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने २.५ पीएस नोंदवले गेले. दिल्लीत जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक असते.
