मुंबई- एअर इंडियाने कोणतेही कारण न देता मुंबईहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानाच्या वेळापत्रकात बदल केले . त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली . अनेक प्रवाशांचा पुढे प्रवास होता यामुळे प्रवासी सतत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून विलंबाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. विमानाच्या वेळापत्रकात बदल झाल्याचे ग्राउंड स्टाफला देखील माहिती नव्हती. अखेर काही तासानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानाच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती दिली. सुरुवातीला प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय करून देण्याचे मान्य केले . मुंबईहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे विमान काल दुपारी १.२५ मिनिटांनी उड्डाण घेणार होते. मात्र, काही तास वाट पाहिल्यानंतर दुपारी ३.४५ मिनिटांनी विमान उड्डाणाच्या वेळेत बदल केली आहे व हे विमान संध्याकाळी ७ वाजता प्रस्थान करील, असे सांगण्यात आले. परंतु संध्याकाळी ५ वाजता विमान रद्द झाल्याची घोषणा केली. काल दुपारी १.२५ मिनिटाने उड्डाण घेणाऱ्या विमानाने आज सकाळी ९ वाजता उड्डाण केले .
