गोव्यात कुत्र्याच्या हल्ल्यात ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  • कुत्रामालकावर गुन्हा
    पणजी – गोव्यातील हणजूण येथे अमेरिकन पिटबूल टेरियर जातीच्या पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात एका सात वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाला.या प्रकरणी कुत्र्याचा मालक अब्दुल कादर ख्वाजा यांच्याविरूध्द हणजूण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे.
    प्रकाश कळंगुटकर असे या मुलाचे नाव आहे. काल सायंकाळी हणजूणच्या पिकेन पेडे येथे या मुलावर ख्वाजा यांच्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवला.या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या प्रकाश कळंगुटकरला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत गोव्याचे पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी तीन महिन्यांत अशा हिंस्त्र कुत्र्यांच्या प्रजातींवर बंदी घालण्यासाठी धोरण तयार केले जाईल,अशी घोषणा केली.