अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास यांची प्रकृती खालावली

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास महाराज यांची प्रकृती आज अधिकच खालावली. काल लखनौच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले . तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे.नृत्य गोपालदास यांना पोटाचा विकार असल्याचे समजते. ८६ वर्षीय नृत्य गोपालदास २४ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी उत्सव साजरी करण्यासाठी अयोध्येतून मथुरेला गेले होते. तिथून ते इंदूरलाही गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ग्वाल्हेरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना लखनौमध्ये आणण्यात आले.त्यांच्यावर यापूर्वीही मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. अयोध्येतील मणिराम दास छावनी येथील आश्रमातील त्यांच्या खोलीत आयसीयूसारख्या वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत.