लेह- लडाख या केंद्रशासीत प्रदेशाला घटनेच्या ६ व्या सूचीत समावेश करुन त्याला संरक्षित क्षेत्राचा विशेषाधिकार द्यावा या व इतर अनेक मागण्यांसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लेह ते दिल्ली पदयात्रा सुरु केली आहे. लडाख अपेक्स बाडी व इतर संघटनाही या पदयात्रेत सहभागी होत आहेत. १ सप्टेंबर पासून निघालेली ही पदयात्रा एक हजार किलोमीटर पायी प्रवास करुन २ ऑक्टोबरला दिल्लीत राजघाटावर पोहोचणार आहे. आज ही यात्रा हिमाचल प्रदेशात पोहोचली आहे.सोनम वांगचुक यांनी लडाखच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. काही महिन्यांपूर्वीही त्यांनी लडाखच्या भूमीत चीनच्या हस्तक्षेपाच्या विरोधात उपोषण केले होते. लडाखला राज्याचा दर्जा द्यावा, त्याचा घटनेच्या ६ व्या सूचीत समावेश करुन संरक्षित क्षेत्र घोषित करावे. लडाखमध्ये लोकप्रतिनिधींचे शासन आणून लोकशाही पुन्हा स्थापित करावी या मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. नव्याने घोषित झालेल्या जिल्ह्यांना स्वायत्तता देऊन लोकनियुक्त लोकप्रतिनिधींच्या वतीने कारभार चालवायला द्यावा असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिलेल्या विविध आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठीही ही यात्रा असल्याचे सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे. यात्रेत त्यांच्याबरोबर १०० स्वयंसेवकही सहभागी झाले असून यात्रा मार्गातील प्रत्येक गावातील लोकही यात्रेत उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत. सोनम वांगचुक यांच्या या यात्रेचा परिणाम जम्मू काश्मीरच्या निवडणुकांवरही होण्याची शक्यता आहे.
