जालना -मराठा आरक्षणाच्या नावाखाली काही लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आंदोलन करीत आहेत. हे सरकारी आंदोलन आहे,अशा शब्दात राजेंद्र राऊत यांचे नाव न घेता जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली.
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्यात मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र झाला आहे.मनोज जरांगे पाटील यांनी येत्या १७ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे.दुसरीकडे बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी आज ठिय्या आंदोलन केले. मागणी मान्य न झाल्यास राऊत १६ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत.
राऊत यांच्या या आंदोलनावर तीव्र नापसंती दर्शविताना जरांगे म्हणाले की, समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहित आहे.मराठा समाज तेवढा समंजस आहे.काही लोकांना फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली आहे.समाज सगळे काही बघत आहे. यांचा पुरता हिशेब केला जाईल.
