Home / News / युरोपात बोरिस चक्रीवादळाचा कहर! २० जणांचा मृत्यू! १५ जण बेपत्ता

युरोपात बोरिस चक्रीवादळाचा कहर! २० जणांचा मृत्यू! १५ जण बेपत्ता

प्राग- युरोपच्या मध्य व पूर्व भागाला बोरिस या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून गेल्या चार दिवसांपासूनच्या पूरस्थितीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरात अनेकजण जखमी झाले असून १२ ते १५ जण बेपत्ता आहेत. युरोपातील, चेक गणराज्य, पोलंड, ऑस्ट्रिया, रोमानिया, स्लोवाकिया, हंगेरी, जर्मनी, क्रोशिया या देशांमध्ये हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी मदत पोहोचवण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून युरोपच्या मध्य व पूर्व भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. या वादळाचा सर्वात मोठा फटका हा चेक गणराज्य व पोलंडला बसला आहे. पोलंडने राष्ट्रीय आणिबाणी घोषित केली आहे. रोमानियात २० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून पोलंडमध्ये ४० हजार लोक बेघर झाले आहेत. चेक गणराज्यातील बेला नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. डेन्यूब नदीही धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. या पुराचा फटका काही प्रमाणात जर्मनीलाही बसला आहे. येथील अनेक शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पाणीच पाणी झाले आहे. पोलंडच्या वॉर्सा शहरातील पुराचा फटका शहरातील ६ लाख नागरिकांना बसला आहे. पोलंडच्या क्लोडझो शहरातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पोलंडमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या मदतछावण्यांतही या पुराचे पाणी घुसले आहे. पोलंडमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. नायसा शहरातूनही ४० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
इटालीच्या हवामान विभागानेही नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. क्रोशियालाही या पूराचा चांगलाच फटका बसला असून तिथेही मदत व बचावकार्य करण्यात आले. युरोपच्या अनेक देशांमधील नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. युरोपव्यतिरिक्त अमेरिकेच्या कॅरोलिना शहरही पाण्याखाली गेले असून इथून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अशियाई देशांत चीनची राजधानी शांघायलाही पुराचा फटका बसला असून रेल्वे व रस्तेवाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.