अहमदाबाद – सिमेंट, वीजनिर्मिती, खाद्यतेल, इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक क्षेत्रात असलेला अदानी उद्योगसमूह आता सौरऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याचीही निर्मिती करणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे अॅल्युमिनियम फ्रेम, सोलर बॅटरीच्या चकत्या, यासारख्या विविध सामुग्रीची निर्मिती केली जाणार आहे.सौरऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीसाठी गुजरातमधील मुंद्रा इथे कारखाना उभारण्यात येणार आहे. यासाठी अदानीने न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड ही नवी कंपनी सुरु केली आहे. या कंपनीत फ्रान्सच्या टोटाल एनर्जीज या कंपनीची २५ टक्के गुंतवणूक आहे. सध्या देशातील अनेक महत्त्वाचे व मोठे ऊर्जानिर्मिती प्रकल्प अदानींच्या ताब्यात आहेत. त्यातील काही सौर प्रकल्प असून त्याला लागणारे साहित्य देशात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. काही सामानाची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. यावर उपाय म्हणून ही निर्मिती अदानी स्वतःच करणार आहे. या ठिकाणी मॉड्युल, इनगेट व सेल मधील महत्त्वपूर्ण असलेल्या वेफरची निर्मिती होणार आहे. २०३०पर्यंत अदानी सौरऊर्जेच्या माध्यमातून १० गीगावॉट वीजनिर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
