वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरी! 7 प्रवासी जखमी! 2 गंभीर

मुंबई- दिवाळी सण आणि 5 नोव्हेंबरला येणाऱ्या छटपूजेसाठी उत्तर प्रदेशला निघालेल्या हजारो गरीब प्रवासी आज वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीत सापडले. या भीषण घटनेत 7 प्रवासी जखमी झाले आणि 2 प्रवाशांची प्रकृती गंभीर झाली आहे. या सर्वांवर भाभा आणि केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवाळी सण आणि छटपूजा काळात रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. अंत्योदय योजनेखाली आज सकाळी वांद्रा ते गोरखपूर अशी 22 डब्यांची रेल्वे सकाळी 9 वाजता निघणार होती. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित होती. यामुळे या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी मुंबईतील उत्तर भारतीयांनी वांद्रे स्थानकावर पहाटेच प्रचंड गर्दी केली होती. पहाटे 3 च्या सुमारास रेल्वे फलाट क्रमांक 1 वर येताच अनारक्षित डब्यात घुसून जागा पकडण्यासाठी जोरदार ढकलाढकली झाली. त्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. काही फलाटावर कोसळले. काहींचे शर्ट फाटले. सामान आणि चपला इकडेतिकडे विखुरल्या. अतिशय भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या गाडीत सणाच्या काळात प्रवेशासाठी हजारो प्रवासी येऊ शकतात याचा कोणताही अंदाज रेल्वे पोलिसांनी घेतला नाही. यामुळे फलाटावर जेमतेम 50 पोलीस तैनात होते. हे पोलीस हजारोंची गर्दी आवरू शकले नाहीत. डब्यात चढण्यासाठी रेटारेटी झाली तेव्हा पोलिसांना काहीही करता आले नाही. पोलिसांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे या गर्दीतील 7 प्रवासी जखमी झाले तर दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर झाली आहे. रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणे स्वतःवरील जबाबदारी ताबडतोब झटकून टाकली.
फलाटावरील झालेल्या या चेंगराचेंगरीत शब्बीर अब्दुल रहमान (40), परमेश्वर सुखदार गुप्ता (28), रवींद्र हरिहर चुमा (30), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (29), संजय तिलकराम कांगे (27), दिव्यांशु योगेंद्र (18), मोहम्मद शरीफ शेख (25), इंद्रजीत साहनी (19) आणि नूर मोहम्मद शेख (18) हे प्रवासी जखमी झाले. या घटनेनंतर तातडीने त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी इंद्रजित सहानी आणि नूर शेख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले.
अंत्योदय एक्स्प्रेस यार्डातून वांद्रे टर्मिनसवर आली तेव्हा फलाटावर आरपीएफ, जीआरपी आणि होमगार्डचे मिळून 50 ते 60 कर्मचारी तैनात होते. चेंगराचेंगरी झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्ट्रेचर आणि खांद्यावरून उचलून जखमींना रुग्णालयात नेले. दिवाळी आणि छटच्या सणासाठी उत्तर भारतातील अनेकजण आपल्या गावी जातात. त्यामुळे 22 अनारक्षित डबे असूनही प्रवाशांची प्रचंड गर्दी होती, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
या दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन न करता आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रेल्वे विभागाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील म्हणाले की, अंत्योदय एक्स्प्रेस ही साप्ताहिक रेल्वे आहे. वांद्रे ते गोरखपूर या दरम्यान प्रत्येक रविवारी ही गाडी चालवली जाते. या ट्रेनला 22 कोच लावले जातात. सर्व जनरल कोच असतात. कोणतेही बुकींग व रिझर्व्हेशन नसते. त्यामुळे या ट्रेनला गर्दी असते.
या घटनेवर विरोधकांनी रेल्वे विभागावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुविधांबाबत कुणीही चर्चा करायला तयार नाही. येथील समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. रेल्वे मंत्री महाशय बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत आणि आमचे प्रवासी चेंगरुन मरत आहेत. देशात 17 मोठ्या अपघातांसह इतरही छोटे मोठे अपघात झालेत. त्यात अनेक लोकांचे मृत्यू झाले. नितीन गडकरी हवेत बस उडवण्याची चर्चा करतात, पण जमिनीवर काय घडत आहे?
आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टवर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत म्हणाले की, आपल्या रील मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवे. सध्याचे रेल्वे मंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपाने अश्विनी वैष्णव यांना निवडणुकीसाठी भाजपा महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, परंतु दर आठवड्याला काही ना काही घटना रेल्वे दुर्घटना आणि अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणे, हे लज्जास्पद आहे.
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? असा सवाल केला आहे. ते म्हणाले की, मुंबईतील वांद्रे टर्मिनलवर झालेली चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना योग्य उपचार मिळतील याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. सत्ताधाऱ्यांसाठी मुंबई शहर फक्त पैसा ओरबाडण्याची खाण आहे. सर्वाधिक कर भरून आणि हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या घोषणा होऊनही मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. लोकल प्रवासी रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. एकदा बाहेर गेलेला माणूस घरी परत येईल की नाही याची खात्री नसते. काही वर्षांपूर्वी प्रभादेवी रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर वांद्रे येथे चेंगराचेंगरीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. त्या घटनेतून सरकारने कोणतेच शहाणपण शिकल्याचे दिसत नाही! मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?
दरम्यान, या घटनेनंतर तिची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर, स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या प्रवाशांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध 8 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.