चंद्रावर उतरलेले अंतराळवीर अल्डरीन यांचा ट्रम्पना पाठिंबा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अपोलो २ या मोहिमेचे अंतराळवीर आणि चंद्रावर उतरलेले ब्रिगेडिअर जनरल बझ अल्डरिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी पाठिंबा जाहीर करत ट्रम्प यांचे कौतुकही केले आहे.एक्स वरील संदेशात बझ यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले आयुष्य वैज्ञानिक प्रगती व अंतराळ मोहिमांना प्रोत्साहन देण्यासाठी वेचले. अमेरिकेच्या अंतराळ धोरणामध्ये व राष्ट्रीय सुरक्षेमधील ट्रम्प यांचे निर्णय महत्त्वाचे होते. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अंतराळातील मानवी मोहिमांना गती मिळाली होती. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या कामातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. सध्या जागतिक पातळीवर संरक्षणाचे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला स्थानिक शांतता व आर्थिक स्थिरता हवी असून त्यासाठी आपल्या देशाला असा नेता हवा आहे ज्याने या क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मानवी स्वभाव समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे व योग्य ते निर्णय घेता आले पाहिजेत. कितीही दडपण आले तरी ज्या शांतपणे ते निर्णय घेतात त्यातून त्यांची वैचारिक प्रगल्भता दिसून येते.