मुंबई – ५३८ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगप्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला.जेट एअरवेजला दिलेल्या ५३८.६२ कोटी रुपयांचा गोयल यांनी अपहार केला अशी तक्रार कॅनरा बँकेने केली होती. त्यावरून मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करून ईडीने सप्टेंबर २०२३ मध्ये नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना अटक केली होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये ज्यावेळी ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले त्याच दिवशी न्यायालयाने अनिता गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. यावर्षी १६ मे रोजी त्यांचे निधन झाले.७५ वर्षीय नरेश गोयल हे कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यावर उपचार घेण्यासाठी त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. मे महिन्यात न्या.एन जे जमादार यांच्या एकलपीठाने गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.त्यानंतर जामिनाचा कालावधी पहिल्यांदा चार आठवड्यांनी आणि दोन महिन्यांनी वाढविण्यात आला होता. आज न्या. जमादार यांनी त्यांना नियमित जामीन दिला .
