बुलडाण्याच्या धाडमध्ये दगडफेक! मिरवणुकीत वाद ! बाजारपेठ बंद

बुलडाणा -बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी करत तुफान दगडफेक, वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे धाड गावात आज तणावपूर्ण शांतता होती. धाड गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

धाड गावात दगडफेक आणि जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. जमावाला पांगवून पोलिसांनी सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दंगलस्थळ, मुख्य चौक आणि संवेदनशील भागात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे आज सकाळी या गावातील दुकाने व्यापार्‍यांनी बंद ठेवली होती. परिणामी गावातील रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.