Home / News / ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता

‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता

PM Kisan 19th installment date: शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची वाट अनेक दिवसांपासून पाहत आहेत. या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून 19वा हप्ता कधी जारी केला जाईल, याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत योजनेंतर्गत 18 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता 19व्या हप्त्याची तारीख सरकारने जाहीर केली आहे.

24 फेब्रुवारीला येणार पुढील हप्ता

पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधून या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी जवळपास 1 महिना अजून वाट पाहावी लागेल.

आतापर्यंत 18 हप्ते जमा

पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारद्वारे राबवली जाते. फेब्रुवारी 2019 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3 टप्प्यांमध्ये वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता लवकरच 19 हप्ता दिला जाईल.

केवायसी करणे गरजेचे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. शेतकरी pmkisan.gov.in या वेबसाइटच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.