बुधवारपासून मुंबईचे डबेवाले सहा दिवस रजेवर जाणार !

मुंबई- सातासमुद्रापार ज्यांची ख्याती आहे असे ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणजेच मुंबईचे डबेवाले येत्या बुधवार ९ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. ९ ते १४ एप्रिल या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १५ एप्रिलपासून पुन्हा डबेवाले नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर हजर होऊन मुंबईकरांना सेवा देतील.
मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले की, मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये वेळेत डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील गावांमधून येतात. त्याठिकाणी सध्या गावाकडील ग्रामदैवत, कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे या कालावधीत डबे पोहोचवण्याची सेवा बंद राहील. तरी ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी विनंती तळेकर यांनी केली आहे.