अंबाबाईच्या गरुड मंडपासाठी सागवानी लाकडाचे खांब तयार

कोल्हापूर- करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीचे काम गतीने सुरू आहे. त्यामधील गरुड मंडपासाठी सागवानी लाकडाचे खांब तयार झाले असून काल शनिवारी हे खांब अंबाबाई मंदिरात आणण्यात आले. लवकरच खांब उभारणीला सुरुवात होणार आहे.

अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जुना गरुड मंडप पूर्णपणे उतरूवून घेण्यात आला. दुसर्‍या टप्प्यात गरुड मंडपासाठी पाया उभारणी करून त्यावर लाकडी खांब रोवण्यात येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीसाठी स्वनिधीतून १२ कोटी ८५ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मूळ गरुड मंडपामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होता.लाकूड काम खचल्याने गरुड मंडपाची पुनर्उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरातत्त्व विभागाच्या निकषांनुसार गेल्या दीड वर्षापासून हे काम सुरू आहे. यासाठी कर्नाटकातील दांडेली येथून विशिष्ट प्रकारचे सागवानी लाकूड आणण्यात आले. या लाकडापासून गरुड मंडपासाठी आवश्यक असणारे खांब तयार करण्याचे काम टेंबलाई मंदिर परिसरात सुरू होते. २२ कारागीर या कामामध्ये कार्यरत आहेत. आता सागवानी लाकडापासून तयार करण्यात आलेले खांब शनिवारी अंबाबाई मंदिरात आणण्यात आले. हे खांब रोवण्यासाठी गेल्या आठवड्यापासून लोखंडी पोल उभारण्याचे काम सुरू होते. आता खांब उभारणीला गती येणार आहे. या लाकडी खांबांना भक्कमपणा येण्यासाठी बांधकाम प्रणालीमध्ये वापरली जाणारी ऑईल प्रक्रिया करण्यात येणार आहे. एका विशिष्ट प्रकारच्या तेलाने ही प्रक्रिया केली जाते. यामुळे लाकडाचे आयुष्य वाढते.