Aaple Sarkar portal | राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे ‘आपले सरकार’ पोर्टल (Aaple Sarkar portal) पुढील पाच दिवस बंद राहणार आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MAHAIT) यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, नियमित आणि तांत्रिक देखभालीसाठी १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ (April 10 to April 14, 2025) या कालावधीत ‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पूर्णपणे बंद राहील.
या काळात ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही ऑनलाइन सेवा (online services) नागरिकांना उपलब्ध होणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाआयटीने केले आहे. विशेष म्हणजे, या पाच दिवसांच्या कालावधीत केवळ एक दिवस कार्यालयीन कामकाजाचा आहे, तर उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टी (public holiday) चे आहेत.
राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र (Setu centres) चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
‘आपले सरकार’ पोर्टल हे महाराष्ट्र शासन (Maharashtra government) चे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (Maharashtra Right to Public Services Act 2015) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या पोर्टलमुळे नागरिक विविध सरकारी सेवांसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि आवश्यक माहिती मिळवू शकतात. नागरिकांना सरकारी सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.
आता या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ते पुढील पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, ज्या नागरिकांना या काळात विविध सरकारी सेवांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी याची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या कामाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.