सीएनजी व पाईप गॅसच्याही दरात वाढ! महागाईचा भडका


मुंबई-घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 50 रुपये वाढविला, पेट्रोल आणि डिझेल यावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याची घोषणा कालच झाली. यामुळे खिशाला फटका बसणार हे स्पष्ट झाले. त्यानंतर आता महानगर गॅस लिमिटेडने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाईप नॅचरल गॅस (पीएनजी) यांचे दर वाढवले आहेत. या सर्व दरवाढीमुळे महागाई असहाय्य होणार आहे. आरबीआयने आज रेपो दर कमी करून कर्जाचे हप्ते कमी करण्याची योजना केली , पण दरवाढीने खर्च प्रचंड वाढणार असल्याने बचत होण्याची शक्यता मावळली आहे.
सिलिंडर महाग केल्याचा फटका राज्यभर बसल्यानंतर आता पाईप गॅस दरवाढीचा फटका मुंबई, ठाणे आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना बसणार आहे. सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपयांची वाढ होऊन प्रति किलो दर 79.50 रुपये इतका झाला आहे, तर पीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ होऊन तो 49 रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर झाला आहे. ही दरवाढ केवळ मुंबईपुरतीच मर्यादित नसून, दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम यांसारख्या शहरांमध्ये सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढणार आहे. त्यातच अमेरिकेने आयात शुल्क 26 टक्के केल्याने द्राक्ष, आंबा आदि उत्पादनांना अमेरिकेची बाजारपेठ बंद होणार आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
डाळींची किंमतही 100 रूपये पार गेली आहे. शिवाय आरोग्य व शिक्षण यावरील खर्च आवाक्याच्या बाहेर जात आहे . एकूणच महागाईचा भडका उडाला असल्याने गरीब व मागासवर्गीयांची झोप उडाली आहे.