‘महाराष्ट्रातील निवडणूक फ्रॉड’, मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर गंभीर आरोप

Congress national convention in Gujarat | नुकतेच अहमदाबाद (Ahmedabad) येथे काँग्रेसच्या अखिल भारतीय अधिवेशन (AICC) पार पडले. या अधिवेशनात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. विशेषतः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) निकालांविषयी त्यांनी थेट फसवणूक केल्याचा आरोप करत गंभीर प्रश्न उपस्थित केले.

खरगे म्हणाले, “महाराष्ट्रातील निवडणूक म्हणजे एक फ्रॉड होती. भाजपने 150 पैकी तब्बल 138 जागांवर विजय मिळवला. म्हणजे जवळपास 90% जागा त्यांनी जिंकल्या. असा एकतर्फी निकाल देशात कधीच पाहिला नाही.”

खरगे यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (EVM) ही संशय व्यक्त केला. “संपूर्ण जग आता मतपत्रिकेकडे परत वळत आहे, पण भारतात अजूनही ईव्हीएम वापरले जातात. ही यंत्रणा सत्ताधाऱ्यांना फायदेशीर आणि विरोधकांना तोट्याची आहे,” असं खरगे म्हणाले.

त्यांनी अधिक स्पष्ट करत सांगितले की, “तुम्ही अशा प्रणाली तयार केल्या आहेत, ज्या भाजपला फायदा देतात. आम्ही पुरावे सादर करू म्हटलं की, म्हणतात ‘कुठला पुरावा?’ पण फसवणूक तर संपूर्ण प्रक्रियेतच आहे.”

खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवरही (Modi Government) सडकून टीका केली. “हे सरकार सरकारी मालमत्ता आपल्या जवळच्या भांडवलदारांना (crony capitalists) विकत आहे. हीच धोरणं लोकशाहीची गळचेपी करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला

खरगे यांनी हरियाणा (Haryana) राज्यातील निवडणुकांवरही प्रश्न उपस्थित केले. “महाराष्ट्रात जे घडलं, तेच हरियाणात. मतदार याद्यांमध्ये फेरफार, संशयास्पद निकाल, आणि सर्वत्र भाजपलाच फायदा. हा निव्वळ योगायोग नसून योजनाबद्ध कट आहे,” असे ते म्हणाले.

भाजपच्या बाजूने काम केल्याचा आरोप करत खरगे म्हणाले, “निवडणूक आयोगाने (Election Commission) घोटाळा थांबवण्याऐवजी आमच्यासारख्या प्रश्न विचारणाऱ्यांनाच सवाल केले. आयोगाचे वर्तनही आता सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेले आहे.”

“या देशातील तरुण उठतील आणि म्हणतील, ‘आम्हाला मतपत्रिका हवी आहे.’ लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे,” असं सांगत त्यांनी युवकांना मतपत्रिकेच्या समर्थनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.