रिलायन्स ब्रँड्सचे माजी CEO दर्शन मेहतांचे निधन, भारताच्या लक्झरी रिटेल क्षेत्राला मिळवून दिली वेगळी ओळख

Darshan Mehta

Darshan Mehta | रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडचे (Reliance Brands Limited – RBL) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दर्शन मेहता (Darshan Mehta) यांचे 9 एप्रिल 2025 रोजी निधन झाले. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेहता यांनी भारतीय फॅशन आणि लक्झरी रिटेल क्षेत्रात मोलाची भर घातली होती.

17 वर्षांच्या नेतृत्वात लक्झरी ब्रँड्सचा भारतात प्रवेश

2007 मध्ये RBL ची स्थापना झाल्यापासून मेहता संस्थेचा अविभाज्य भाग होते. अध्यक्ष आणि CEO या भूमिकेत त्यांनी Valentino, Versace, Armani, Bottega Veneta, Coach, Jimmy Choo, Muji, Zegna, BOSS, आणि Pottery Barn यांसारख्या 90 हून अधिक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना भारतात यशस्वीरित्या आणले. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतात लक्झरी आणि लाइफस्टाइल रिटेल सेक्टरला नवे परिमाण मिळाले.

2024 मध्ये कार्यकारी पदाचा राजीनामा

2024 मध्ये त्यांनी CEO पदाचा राजीनामा दिला. मात्र, ते रिलायन्स ब्रँड्सच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. या नव्या भूमिकेतून त्यांनी धोरणात्मक सल्लागार म्हणून आपले योगदान सुरू ठेवले होते.

रिलायन्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी, मेहता यांनी 2001 ते 2007 दरम्यान Arvind Brands Ltd. चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तिथे त्यांनी Tommy Hilfiger, GANT, आणि Nautica यांसारख्या क्रीडावेअर ब्रँड्स भारतात आणण्याचे काम केले.

त्याआधी त्यांनी Price Waterhouse Mumbai मध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि नंतर Trikaya Grey Advertising (आता WPP चा भाग) मध्ये वरिष्ठ पदांवर काम केले.

व्यावसायिक पात्रता आणि उद्योगजगतातील आदर्श नेतृत्व

दर्शन मेहता हे चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट होते. त्यांनी केवळ RBL नव्हे, तर संपूर्ण भारतीय रिटेल क्षेत्राला एक विशिष्ट ओळख दिली.