आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने तिरुपती मंदिरात जाऊन अर्पण केले केस, कारण काय?

Pawan Kalyan wife anna konidela | आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या पत्नी अ‍ॅना कोनिडेला (Anna Konidela) यांनी तिरुमला (Tirumala) येथील प्रसिद्ध मंदिरात आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या नवस पूर्ण केला. त्यांनी नवस पूर्ण करण्यासाठी डोक्याचे केस अर्पण केले.

काही दिवसांपूर्वी सिंगापूर (Singapore) येथील एका समर कॅम्पमध्ये लागलेल्या आगीत अ‍ॅना-पवन यांचा मुलगा मार्क शंकर (Mark Shankar) दुर्घटनेत सापडला होता. या घटनेत त्याच्या हात-पायांना भाजल्याचे आणि धूर श्वासावाटे आत गेल्याचे निदर्शनास आले होते. त्या काळात अ‍ॅना कोनिडेला यांनी आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी नवस केला होता. आता मुलगा या दुर्घटनेतून सुखरूपरित्या परतल्याने, त्यांनी नवस पूर्ण करत देवाप्रती आपले केस अर्पण करतील.

या पार्श्वभूमीवर त्यांनी तिरुपतीत (Tirupati) पद्मावती कल्याण कट्ट्यावर पारंपरिक विधींचा भाग म्हणून केस अर्पण करत नवसपूर्ती केली. जनसेना पक्षाने (Jana Sena Party) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अ‍ॅना कोनिडेला यांनी परंपरेनुसार नवसपूर्तीचा विधी पूर्ण केला असून, त्यांनी देवाच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त केली.”

विशेष म्हणजे, अ‍ॅना कोनिडेला या मूळच्या रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन असूनही, त्यांनी तिरुपती तिरुमला देवस्थानमच्या (TTD) नियमांचा सन्मान राखत गायत्री सदन येथे भगवान वेंकटेश्वरावरील श्रद्धेचे घोषणापत्र मंदिर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करून सादर केले.

देवाच्या कृपेने आपल्या मुलाचे प्राण वाचल्याचे मानून त्यांनी ही आस्था व्यक्त केली, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.