Dhoni Review System | चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा आपल्या नेमक्या निर्णयक्षमतेने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध झालेल्या सामन्यात निकोलस पूरनला बाद करण्यासाठी घेतलेल्या DRS निर्णयाने ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ (Dhoni Review System) पुन्हा चर्चेत आली आहे.
सामन्याच्या चौथ्या षटकात अंशुल कंबोजचा चेंडू पूरनच्या पॅडवर आदळला. अपील फेटाळल्यानंतरही गोलंदाजाने धोनीकडे पाहत रिव्ह्यूची विनंती केली. कर्णधार धोनीने स्मितहास्य करत निर्णय घेतला आणि बॉल ट्रॅकरने चेंडू स्टंपवर आदळला असल्याचे दाखवले. पंचांनी पूरनला बाद ठरवल्यावर स्टेडियम आणि सोशल मीडियावर जल्लोष उसळला.
सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या पूरनने (Nicholas Pooran) या हंगामात 7 सामन्यांत 59.5 च्या सरासरीने 357 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. त्याच्या विकेटमुळे एलएसजीचा डाव डळमळीत झाला. पूरनला बाद करण्यासाठी धोनीने घेतलेल्या डीआरएसची आता चर्चा होत आहे.
दरम्यान, या सामन्याआधी फॉर्मात नसलेल्या सीएसकेने सामन्यात काही बदल केले होते. आर. अश्विनला (R Ashwin) विश्रांती देण्यात आली आणि चेन्नईने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
सामन्याच्या शेवटी धोनीने 11 चेंडूंमध्ये 26 धावांची वादळी खेळी करत सीएसकेला 5 गडी राखून विजय मिळवून दिला आणि IPL 2025 मधील विजयाचा दुष्काळ संपवला. सामन्यानंतर धोनीला सामनावीराचा (Player of the Match) पुरस्कार देण्यात आला. धोनीला तब्बल 2206 दिवसांनी सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. याआधी 2019 ला राजस्थानविरुद्धच्या सामन्यातील खेळीसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना धोनी स्वतःच थोडा गोंधळलेला होता. आयपीएलमधील हा त्याचा 18 वा सामनावीर पुरस्कार ठरला आहे.
तो म्हणाला, “मलाही आश्चर्य वाटलं की तुम्ही लोक मला सामनावीराचा पुरस्कार का देत आहात. मला वाटतं नूरने (Noor Ahmad) खूप छान गोलंदाजी केली. तसेच नवीन चेंडूने गोलंदाजी करणारे खेळाडूही उत्कृष्ट खेळले.”