Mehul Choksi Extradition | बेल्जियम येथे फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. लवकरच तपास अधिकारी यासाठी बेल्जियमला रवाना होण्याची शक्यता आहे.
चोक्सीवर पंजाब नॅशनल बँक घोटाळा (PNB Scam) प्रकरणात आर्थिक फसवणुकीचे आरोप असून, 2018 पासून तो फरार होता.
भारतीय अधिकाऱ्यांनी 12 एप्रिल रोजी चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी (extradition) औपचारिक विनंती केली होती. त्यानंतरच बेल्जियममधील अँटवर्प पोलिसांनी चोक्सीला अटक केली. यासंदर्भात अँटवर्पमधील पब्लिक प्रॉसिक्यूटर्स ऑफिसच्या आदेशावरून ही अटक झाली, असे पोलिस प्रवक्त्याने स्पष्ट केले.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) यांनी प्रत्येकी दोन ते तीन अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे अधिकारी लवकरच बेल्जियमला जाऊन तेथील सरकारशी समन्वय साधतील आणि प्रत्यार्पणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करतील. चोक्सी ही प्रक्रिया न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता असल्याने भारताकडून अधिक स्पष्ट आणि कायदेशीर तयारी सुरू आहे.
चोक्सीच्या अटकेनंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चोक्सीवर कर्करोगाचा उपचार सुरू आहे आणि वैद्यकीय आधारावर त्याच्या जामिनासाठी अर्ज केला जाईल. तसेच, तो फरार होण्याचा धोका नसल्याचाही दावा करण्यात येणार आहे. सध्या बेल्जियममधील अटक निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
CBI आणि ED च्या मुख्यालयांमध्ये चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर रणनीतीबाबत उच्चस्तरीय बैठकांनाही सुरुवात झाली आहे. दोन्ही संस्था हा खटला देशात आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तयार आहेत.
मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी (Nirav Modi) यांच्यावर 2018 मध्ये मुंबईतील पंजाब नॅशनल बँक (PNB) शाखेत 13,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोघांविरोधात CBI आणि ED कडून अनेक आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.