महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा

मुंबई- महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती आहे. मात्र या पाणीसाठ्यातील काही टक्केच पाणी वापरता येण्याजोगे असल्याने नागरिकांना एप्रिलमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणी पुढील तीन दिवसांमध्ये उणेमध्ये जाण्याची शक्यता आहे. या धरणात केवळ तीन टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा आहे. त्यानंतर या धरणाचा समावेश मृत पाणीसाठ्यात होईल. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 6 हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्यामुळे या धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे.
राज्यात एकूण 2,997 लहान-मोठी धरणे आहेत. त्यांची एकत्रित जिवंत साठवण क्षमता 40,498 दशलक्ष घनमीटर आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत राज्यातील धरणांत फक्त 30,034 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांत 35.16 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदाचे प्रमाण किंचित चांगले असले तरी उन्हाळ्यात धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत असते.
दरम्यान, भारतातील हवामान विषयक अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने यावर्षी सरासरी 105 टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 105 टक्के पाऊस होईल. 96 ते 104 टक्के हा पाऊस सरासरीइतका म्हणजे सर्वसामान्य समजला जातो. यामध्ये 5 टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 868.6 मिमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
स्कायमेटचे जतीन सिंह म्हणाले की, या काळात ला निना कमजोर असेल. तर मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो यंदा शक्यता नसेल. ला निना कमकुवत असणे आणि एल निनो प्रभावी नसणे यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्याने केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय मागील चार ते पाच दिवसांत वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात झाली आहे. हवेचा दाब, समुद्राचे तापमान आणि वाऱ्याची दिशा यामधून त्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.