Neeraj Chopra | दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने 2025 च्या हंगामाची सुरूवात दमदार कामगिरीने केली आहे. नुकत्याच झालेल्या पॉच इनव्हिटेशनल ट्रॅक स्पर्धेत (Potch Invitational Track Event) त्याने 84.52 मीटर अंतर फेकून सुवर्णपदक पटकावले.
चोप्राची पहिली कामगिरी 80 मीटरपलीकडे
स्पर्धेतील सहा स्पर्धकांमध्ये नीरज आणि दक्षिण आफ्रिकेचा डाऊ स्मिट (Douw Smit) हे दोघेच 80 मीटरचा टप्पा पार करू शकले. नीरजने 84.52 मीटर (Javelin Throw) तर डाऊने 82.44 मीटर अंतर फेकले. नीरजची ही फेक त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम 89.94 मीटरपेक्षा कमी असली तरी ती आत्मविश्वास वाढवणारी ठरली.
नवा कोच, नवी तयारी – 90 मीटरचा टप्पा लवकरच?
2025 हंगामासाठी नीरजने आपला जुना प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिएट्झ (Klaus Bartonietz) यांच्यापासून वेगळे होत, नवीन प्रशिक्षक म्हणून भालाफेक दिग्गज जान झेलेझनी (Jan Železný) यांना निवडले आहे. झेलेझनी यांच्याकडे 98.48 मीटरची जागतिक विक्रमी भालाफेक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज आपली तंत्र सुधारत असून 90 मीटरचा टप्पा लवकरच पार करण्याचा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला आहे.
वैयक्तिक आयुष्यातही नवीन सुरुवात
या हंगामात पदार्पण करण्यापूर्वी जानेवारी महिन्यात नीरजने आपल्या दीर्घकाळच्या मैत्रिणी हिमानी मोर (Himani Mor) हिच्याशी हिमाचल प्रदेशात खासगी समारंभात विवाह केला. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेत प्रशिक्षण सुरू केले.
जागतिक स्पर्धेवर लक्ष
नीरज आता पुढील महिन्यात (16 मे) होणाऱ्या दोहा डायमंड लीग (Doha Diamond League) मध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर तो सप्टेंबरमध्ये टोकियो येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आपले पदक टिकवण्याच्या तयारीत आहे. 2024 मध्ये त्याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये 89.45 मीटर फेकून रौप्य पदक जिंकले होते.