Smriti Mandhana Cricket Academy | भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) दुबईत स्वतःची क्रिकेट अकादमी सुरू केली आङे. स्मृतीने यूकेस्थित प्रसिद्ध प्रशिक्षक डॉन भगवती (Don Bhagawati) यांच्यासोबत मिळून दुबई इंटरनॅशनल अकादमी अल बार्शा येथे सिटी क्रिकेट अकादमीची (City Cricket Academy) औपचारिक सुरुवात केली.
दुबईतील या अत्याधुनिक क्रिकेट डेव्हलपमेंट सेंटरमुळे यूएईतील तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षणासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
अकादमीचे वैशिष्ट्ये
ही अकादमी सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी उच्च-प्रदर्शन केंद्र म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये डॉन यांचा दोन दशकांचा प्रशिक्षणाचा अनुभव आणि स्मृती यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आधुनिक दृष्टिकोन यांचा समन्वय आहे. डॉन यांच्या पत्नी, ज्या इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू आहेत, त्या देखील त्यांच्या अनुभवाने तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करतील.
पत्रकार परिषदेत बोलताना स्मृती मंधाना या अनोख्या आणि जागतिक उपक्रमामागील वैयक्तिक आणि व्यावसायिक भागीदारीबाबत बोलताना सांगितले: “डॉन आणि त्यांच्या कुटुंबाने मला नेहमीच आपलेपणाने स्वीकारले आहे. सिटी क्रिकेट अकादमी (City Cricket Academy) ही फक्त प्रशिक्षण सुविधा (Training Facility) नाही, तर येथे तरुण क्रिकेटपटूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, सखोल विचार करण्यासाठी आणि व्यक्ती म्हणून वाढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. डॉन आणि त्यांच्या पत्नीला तरुण खेळाडूंची मानसिकता आणि उच्चस्तरीय क्रिकेटमधील आव्हाने समजतात. माझ्यासाठी ही क्रिकेटने मला दिलेल्या सर्व गोष्टींची परतफेड करण्याची संधी आहे.”
या अकादमीचा उद्देश संरचित कोचिंग कार्यक्रम, आजी-माजी खेळाडूंकडून मार्गदर्शन (Mentorship) आणि यूके (UK) आणि भारतातील भागीदार अकादमींसोबत एक्सचेंज प्रोग्रामद्वारे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हा आहे.