Shirish Valsangkar | सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Neurologist Shirish Valsangkar) (वय ६५) यांनी शुक्रवारी (ता. १८) रात्री सोलापूर शहरातील मोदी परिसरातील त्यांच्या निवासस्थानातील बाथरूममध्ये स्वतःच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या (Suicide) केली असल्याची माहिती समोर आली. सायंकाळपर्यंत रुग्णांची तपासणी करणारे आणि कुटुंबासोबत गप्पा मारणारे डॉ. वळसंगकर यांनी अचानकपणे असे टोकाचे पाऊल उचलल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांनी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास त्यांच्या सोनमाता शाळेजवळील निवासस्थानी डोक्यात गोळी मारून घेतली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने त्यांच्या मालकीच्या वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या घराची पाहणी केली असता बाथरूममध्ये रक्ताचे डाग आणि बाजूला एक लहान पिस्तूल (Handgun) पडलेली आढळली.
पोलिसांनी त्यांच्या डोक्यात घुसलेल्या आणि आरपार झालेल्या दोन गोळ्याही जप्त केल्या आहेत. यासोबतच पोलिसांनी मोबाईल फोन आणि इतर वस्तूही तपासणीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, कौटुंबिक वादामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा आहे. सदर बझार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
डॉ. वळसंगकर यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुग्णालयात जाऊन अतिदक्षता विभाग आणि इतर रुग्णांची तपासणी केली होती. अर्ध्या तासात ते घरी परतले आणि पत्नी व मुलीसोबत बेडरूममध्ये गप्पा मारत असताना, फोनवर बोलत असल्याचा बहाणा करून बाथरूममध्ये गेले आणि खिशातून पिस्तूल काढून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. बाथरूममधून आवाज आल्यानंतर पत्नी आणि मुलगी तिथे धावल्या, तेव्हा डॉ. वळसंगकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना तातडीने त्यांच्याच वळसंगकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जवळपास ८ ते १० डॉक्टरांनी दोन तास शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरले. रात्री पावणेअकराच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले आणि शव आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह शेकडो लोकांना त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली.