मुंबई- मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले पूर्व येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर महानगरपालिकेने तोडक कारवाई केली. हे मंदिर अनधिकृत असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिल्यानंतर नियमानुसार पालिकेने ही कारवाई केली असली तरी हे बेकायदेशीर मंदिर वाचवण्यासाठी आज जैन समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. काळ्या फिती व निषेधाचे फलक घेऊन पालिकेच्या कारवाईचा निषेध करत पालिकेने पूर्वसूचना न देताच कारवाई केली असा आरोप आंदोलकांनी केला. जैन समाजाच्या मतांवर डोळा ठेवून भाजपा आमदार पराग आळवणी, मंगलप्रभात लोढा व वर्षा गायकवाड यांनी जैनांच्या या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.
विलेपार्ले पूर्व येथे कांबळे वाडी येथे हे जैन मंदिर आहे. हे मंदिर तीस वर्षे जुने आहे,असा दावा जैन धर्मिय करतात. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी फक्त एक राहते घर होते. त्याचे हळूहळू मंदिरात रुपांतर करण्यात आले.तेथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. या मंदिरात दररोज आरती भजन असे कार्यक्रम सुरू असतात ज्याचा कांबळे वाडीतील रहिवाशांना त्रास होत होता. त्यामुळे रहिवाशांनी या अनधिकृत मंदिराच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयानेही मंदिर अनधिकृत असल्याचा निर्वाळा दिला. याविरोधात जैनांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने कारवाईवर स्टे न दिल्याने पालिकेने दोन दिवसांपूर्वी मंदिरावर तोडक कारवाई केली.
पार्ले पूर्व येथील रेल्वे स्थानकाच्या समोरील प्रसिद्ध रामकृष्ण हॉटेलच्या मागील बाजूस हे मंदिर आहे. ही मालमत्ता रामकृष्ण हॉटेलच्या मालकाची असल्याचे सांगण्यात आले. मंदिरातील भाविकांच्या राबत्यामुळे आणि त्यांच्या गाड्यांच्या ये-जा करण्याने हॉटेलच्या ग्राहकांनाही त्रास होत होता. त्यामुळे रामकृष्ण हॉटेलच्या मालकाने रहिवाशांना फूस लावून तक्रार करायला लावली, असा आंदोलन करणाऱ्या जैन धर्मियांना संशय आहे. त्यामुळे आंदोलनादम्यान रामकृष्ण हॉटेलच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात होत्या. जैनांनी शांततेत मोर्चा काढला, मोठे व्यासपीठ उभारून त्यावरून नेत्यांनी भाषणे करीत कारवाईचा निषेध केला.
