Kailash Mansarovar Yatra 2025 | कोविड-19 (Covid-19) महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेली कैलास मानसरोवर यात्रा (Kailash Mansarovar Yatra) यावर्षी पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिली आहे. भारत-चीन (India-China Relations) संबंधांमध्ये सुधारणा करण्याच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गलवाननंतर ताणलेले संबंध आता सुधारण्याच्या वाटेवर
2020 मध्ये गलवान खोऱ्यातील (Galwan Valley) संघर्षामुळे भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. पण 2024 पासून दोन्ही देशांनी शांततापूर्ण संवाद सुरू केला आहे. ऑक्टोबरमध्ये डेमचोक आणि डेपसांग येथील सैन्य माघारीचे करार, मोदी-जिनपिंग भेट, आणि बीजिंगमध्ये डोवाल-यी यांची बैठक या सगळ्याचा परिपाक म्हणजे यात्रा पुन्हा सुरू होण्याची घोषणा.
मानसरोवर यात्रा (Kailash Mansarovar Yatra)
कैलास पर्वताजवळ तिबेट स्वायत्त प्रदेशातील (TAR) नगारी प्रांतामध्ये मानसरोवर (स्थानिक भाषेत मापम युमत्सो म्हणून ओळखले जाते) हे एक उच्च-उंचीवरील गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
4,600 मीटर उंचीवर असलेले हे सरोवर आणि त्याच्या जवळचे 6,638 मीटर उंचीचे पर्वत, ज्याला हिंदू भगवान शिवाचे निवासस्थान मानतात, ते हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म आणि तिबेटी बोन धर्म यांच्यासाठी पवित्र आहेत. दरवर्षी शेकडो यात्रेकरू या दुर्गम प्रदेशात प्रवास करतात; ते सामान्यतः मानसरोवर तलावापर्यंत ट्रेकिंग करतात आणि नंतर जवळच्या कैलास पर्वताची परिक्रमा करतात.
2020 मध्ये यात्रा थांबण्यापूर्वी, परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान भारतीयांसाठी यात्रेचे आयोजन करत असे. हा प्रवास साधारणपणे 23 ते 25 दिवसांचा असे आणि भारतीय पासपोर्ट धारक, वैद्यकीय आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त (सर्व यात्रेकरूंची प्रवासापूर्वी कसून तपासणी केली जात असे) आणि 18 वर्षांवरील आणि 70 वर्षांखालील कोणतीही व्यक्ती यासाठी पात्र असे.
दरवर्षी एप्रिल-मे पर्यंत नोंदणी सुरू होत असे, त्यानंतर मर्यादित जागांसाठी सोडत काढली जात असे. यात्रेचा एकूण खर्च 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असतो. या वर्षीच्या यात्रेचे तपशील अद्याप परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेले नाहीत.
भारतातून मानसरोवरला (Kailash Mansarovar Yatra 2025) जाणारे दोन अधिकृत मार्ग
लिपुलेख मार्ग (Lipulekh Pass Route): उत्तराखंडमधून 200 किमी खडतर ट्रेकिंग आवश्यक. 1981 पासून वापरात.
नाथुला मार्ग (Nathula Pass Route): सिक्किममार्गे, 1,500 किमीचा प्रवास पण पूर्णतः गाडीने शक्य.
या दोन्ही मार्गांवर केंद्र सरकार संबंधित पर्यटन महामंडळांमार्फत लॉजिस्टिकची जबाबदारी सांभाळतं. चीनच्या बाजूने व्यवस्थेचा अभाव ही पूर्वीच्या स्थगनाची कारणं होती.
नेपाळमार्गेही एक पर्याय उपलब्ध
खाजगी टूर ऑपरेटर नेपाळमार्गे मानसरोवर यात्रा आयोजित करतात. 2023 पासून चीनने नेपाळ सीमा उघडल्याने भारतीय नागरिकांसाठीही हा पर्याय खुला झाला आहे. पण उच्च शुल्क आणि परवानग्यांच्या अटीमुळे ह्या मार्गाचा वापर अत्यल्प आहे.