आयपीएल पदार्पणातच मुंबईविरुद्ध वादळी खेळी; कोण आहे 17 वर्षीय आयुष म्हात्रे?

Ayush Mhatre IPL Debut

Ayush Mhatre IPL Debut | इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2025) युवा खेळाडूंनी मोठी छाप पाडायला सुरुवात केली आहे. 17 वर्षीय आयुष म्हात्रेने (Ayush Mhatre) आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी करत क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळताना त्याने केवळ 15 चेंडूत 32 धावा ठोकून प्रभावी खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट 200 च्या पुढे म्हणजे 213.34 इतका होता.

पदार्पणातच दोन षटकार आणि तीन चौकार

पहिल्याच पाच चेंडूंमध्ये आयुषने दोन षटकार आणि एक चौकार ठोकत आपल्या आक्रमक खेळाची झलक दाखवली. दुसऱ्या चेंडूपासूनच त्याने चौकार मारत खेळीला सुरुवात केली आणि नंतरच्या चेंडूंवर षटकार ठोकले. विशेष म्हणजे पॉवरप्लेमध्ये त्याच्या खेळीमुळे सीएसकेचा स्कोर 50 च्या पुढे गेला.

विरारहून दक्षिण मुंबईपर्यंतचा संघर्ष

आयुष म्हात्रे हा विरारचा रहिवासी असून तो रोज 160 किलोमीटरचा प्रवास करत दक्षिण मुंबईत क्रिकेट सरावासाठी जातो. त्याने यावर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून उत्तम कामगिरी केली असून, विजय हजारे ट्रॉफी मध्ये 117 चेंडूत 181 धावा करत एक विक्रमही केला आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला 30 लाखांच्या किंमतीवर लिस्ट करण्यात आले होते. मात्र, त्याच्यासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. मात्र, आता चेन्नईने त्याला संधी दिली आहे.

आयुषने 9 फस्ट क्लास सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांत 504 धावा केल्या आहेत. 2 शतके आणि 1 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. लिस्ट ए मध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत.

सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या दुखापतीमुळे त्याला अखेर संधी मिळाली आणि त्याने ती दोन्ही हातांनी स्वीकारली. आयुष म्हात्रेला आता आयपीएल 2025 मध्ये सातत्याने खेळण्याची संधी मिळण्याची आशा आहे.