Nishikant Dubey | भारताच्या सरन्यायाधीशांविरोधात केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्यावर निशाणा साधला. कुरेशी निवडणूक आयुक्त नसून ‘मुस्लिम आयुक्त’ असल्याची टीका दुबे यांनी केली आहे. म्हणाले.
कुरेशी यांनी वक्फ (सुधारणा) कायद्यावर टीका करताना, “मुस्लिमांची जमीन हडपण्याचा सरकारचा हा भयंकर आणि वाईट डाव” असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता दुबे यांनी कुरेशींवर निशाणा साधला.
दुबे यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना भारतातील ‘धार्मिक युद्धा’साठी जबाबदार धरले होते. मात्र, भाजपने त्यांच्या या वादग्रस्त टिप्पणीपासून स्वतःला दूर ठेवले आहे.
कुरेशी यांनी सरकारवर आरोप केले
कुरेशी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आरोप केला होता की, “वक्फ कायदा हा निःसंशयपणे मुस्लिमांची जमीन हडपण्याचा सरकारचा भयंकर डाव आहे. सर्वोच्च न्यायालय यावर प्रश्न उपस्थित करेल याची मला खात्री आहे. अपप्रचार यंत्रणेने चुकीची माहिती पसरवण्याचे काम चोखपणे केले आहे.”
यावर भाजप खासदार दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. दुबे म्हणाले, “तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हता, तुम्ही मुस्लिम आयुक्त होता. तुमच्या कार्यकाळात झारखंडच्या संथाल परगणामध्ये सर्वाधिक बांगलादेशी घुसखोरांना मतदार बनवण्यात आले.”
आता विभाजन होणार नाही: दुबे
ते म्हणाले, “पैगंबर मोहम्मद यांचा इस्लाम भारतात 712 मध्ये आला. त्यापूर्वी ही जमीन (वक्फ) हिंदू किंवा आदिवासी, जैन किंवा बौद्ध धर्मियांशी संबंधित होती.” दुबे यांनी सांगितले की, त्यांच्या विक्रमशिला या गावाला 1189 मध्ये बख्तियार खिलजीने जाळले होते आणि विक्रमशिला विद्यापीठाने जगाला आतिश दीपंकर यांच्या रूपाने ‘पहिला कुलगुरू’ दिला होता.
ते म्हणाले, “या देशाला एकत्र करा, इतिहास वाचा. पाकिस्तानची निर्मिती विभागणीतून झाली. आता कोणतीही विभागणी होणार नाही.”
दरम्यान, दुबे यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील वक्तव्यांमुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात ॲटर्नी जनरल यांना पत्रही पाठवण्यात आले आहे.