Rahul Gandhi on Maharashtra Election | काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी ब्राउन विद्यापीठात विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहे.
राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) संदर्भ देताना मतदानातील अनियमिततेवर बोट ठेवले. त्यांनी सांगितले की, “५.३० वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली, मात्र ५.३० ते ७.३० या वेळेत आणखी ६५ लाख मतदारांनी मतदान केल्याचे दाखवले गेले, जे शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदानासाठी सरासरी ३ मिनिटे लागतात. हिशोब केला, तर रात्रभर रांगा लागल्या असत्या – आणि तसे झाले नव्हते.”
राहुल गांधींनी पुढे म्हटले की, “आम्ही विचारले की मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते का, तर आयोगाने नकार दिला. त्यांनी कायदाच बदलला. आता आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग मागूही शकत नाही. ही निवडणूक आयोगाची तडजोड आहे.”
ब्राउन विद्यापीठात (Brown University) झालेल्या या सत्रात राहुल गांधींनी तरुण पिढीशी थेट संवाद साधला. त्यांनी लोकशाही (democracy) आणि भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरील प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, राहुल गांधी 20 एप्रिल रोजी अमेरिकेत पोहोचले. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे (Indian Overseas Congress) अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे त्यांचे स्वागत करत म्हटले, “राहुल गांधी – तरुणाईचा आणि चांगल्या भविष्याचा आवाज. चला ऐकूया, शिकूया आणि एकत्र निर्माण करूया.”
काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी सांगितले की, राहुल गांधी 21 आणि 22 एप्रिल रोजी रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही त्यांनी अमेरिकेचा दौरा केला होता.