व्हॅटिकन सिटी
कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार, पोप यांनी आज स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.३५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कालच त्यांनी ईस्टरनिमित्त व्हॅटिकनच्या बाल्कनीतून लोकांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी ते व्हीलचेअरवर बसलेले दिसले. पोप फ्रान्सिस हे ख्रिश्चन धर्मीयांचे २६६वे पोप होते, तर पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. त्यांच्या मृत्यूच्या वार्तेने जगभरातील ख्रिश्चन समुदायावर शोककळा पसरली आहे.
पोप फ्रान्सिस यांना १४ फेब्रुवारी रोजी न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच आठवडे रुग्णालयात राहिल्यावर ते व्हॅटिकन येथे परतले होते. पोपच्या रक्त तपासणी अहवालात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसून आली होती.
२८ फेब्रुवारी २०१३ रोजी पोप बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिल्यानंतर, १३ मार्च २०१३ रोजी फ्रान्सिस यांनी पोपपद स्वीकारले होते. संत फ्रांसिस ऑफ असीसी यांच्या नावावरून त्यांनी’फ्रान्सिस’ हे नाव घेतले होते.त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनाच्या ब्युनॉस आयर्स शहरात झाला. त्यांचे वडील इटालियन स्थलांतरित होते. १९५८ मध्ये गंभीर आजारातून बरे झाल्यावर त्यांनी सोसायटी ऑफ जीसस मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
फ्रान्सिस यांनी पोप म्हणून घेतलेल्या भूमिकांमुळेही ते चर्चेत राहिले. आतापर्यंतचे सर्व पोप हे व्हॅटिकन सिटीतील मोठे पेंट हाऊस अपार्टमेंट वापरत असत. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी ते नाकारून स्वतःसाठी गेस्ट हाऊसमधील छोटे घर निवडले होते. या निर्णयाचीही चर्चा झाली होती. पोप फ्रान्सिस यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील मुक्त-बाजार या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. चर्चने समलिंगी लोकांबद्दल मत बनवण्यापेक्षा त्यांची माफी मागितली पाहिजे, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. चर्चमध्ये मुलांवरील लैंगिक शोषणाबद्दल त्यांनी माफीही मागितली होती. पोप फ्रान्सिस हे पर्यावरणाच्या संकटाबद्दल जागरूक होते. पोप म्हणून त्यांनी चर्चमध्ये सुधारणा, दीन-दुबळ्यांसाठी सहानुभूती, आणि इतर धर्मीय समुदायांसोबत संवाद वाढवण्यावर भर दिला. २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या होप या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला आहे.