पंतप्रधान मोदींकडून जेडी वेन्स यांच्या कुटुंबाचे आपुलकीने स्वागत; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या मुलांना दिले ‘हे’ खास गिफ्ट

JD Vance India Visit

JD Vance India Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी सोमवारी (21 एप्रिल) अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. वेन्स (JD Vance India Visit), त्यांची पत्नी उषा वेन्स आणिणि त्यांची मुले इवान, विवेक आणि मिराबेल यांचे दिल्लीत स्वागत केले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती पंतप्रधान मोदींच्या 7, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी पोहोचले, जिथे पंतप्रधानांनी त्यांची गळाभेट घेत स्वागत केले. तसेच, त्यांच्या पत्नी आणि मुलांशी संवाद साधला.

यानंतर पंतप्रधान वेन्स यांच्या मुलाचा हात धरून कुटुंबाला आत घेऊन जाताना दिसले. या भेटीदरम्यान, मुलांनी पंतप्रधानांसोबत अनेक खेळकर क्षण अनुभवले. लॉनमध्ये फिरण्यापासून ते पक्ष्यांचे खाद्य उत्सुकतेने पाहण्यापर्यंत, मुलांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी मनसोक्त आनंद घेतला.

या खास भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी इवान, विवेक आणि मिराबेल यांना प्रत्येकी एक मोराचे पीस भेट दिले. मिराबेल वेन्स या मोराच्या पीसाद्वारे वडिलांसोबत खेळताना देखील दिसली.

जे. डी. वेन्स यांचा भारत दौरा

जे. डी. वेन्स यांनी आपल्या कुटुंबासोबत अक्षरधाम मंदिराला भेट देखील भेट दिली. वेन्स यांनी स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट देऊन त्यांच्या चार दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्याला सुरुवात केली.

भेटीनंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी एका निवेदनात म्हटले, “मला आणि माझ्या कुटुंबाला या सुंदर ठिकाणी स्वागत केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही अचूकता आणि काळजी घेऊन सुंदर मंदिर बांधले हे भारतासाठी खूप मोठे श्रेय आहे. विशेषतः आमच्या मुलांना ते खूप आवडले. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.”

वेन्स आणि त्यांचे कुटुंब सोमवारी पालम विमानतळावर उतरले, जिथे रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्याची सुरुवात म्हणून त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्याच्या सर्व प्रमुख क्षेत्रांचा समावेश असेल.