Pope Francis dies | ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने अधिकृत निवेदनात त्यांच्या निधनाची पुष्टी केली असून, ते गेल्या काही काळापासून गंभीर आजारी होते. दोन्ही फुफ्फुसांमध्ये झालेल्या (pneumonia) संसर्गामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. विशेष म्हणजे, रविवारी साजऱ्या झालेल्या ईस्टर (Easter Sunday) दिवशी त्यांनी अनपेक्षितपणे लोकांमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांच्या निधनाची बातमी आली.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर, पुढील पोप कोण असणार याची चर्चा आता अधिकच तीव्र झाली आहे. व्हॅटिकनमधील पारंपरिक प्रक्रियेनुसार, आता पुढील काही दिवसांत नवीन पोपच्या निवडीसाठी विशेष पोप परिषद (Papal Conclave) बोलावली जाणार आहे.
पुढील पोप कोण? ही नावं चर्चेत –
- लुईस अँटोनियो (Philippines): वय 67; फ्रान्सिस यांचे जवळचे सहकारी. अनुभव आणि जागतिक चर्चशी दृढ नाते यामुळे प्रबळ दावेदार मानले जातात.
- पिएट्रो पारोलिन (Italy): वय 70; व्हॅटिकनचे परराष्ट्रमंत्री म्हणून दीर्घ अनुभव. राजनैतिक वाटाघाटींमध्ये प्रभावी कामगिरी.
- पीटर तुर्कसन (Ghana): वय 76; सामाजिक न्याय आणि हवामान बदल यांसाठी प्रसिद्ध. त्यांची निवड ऐतिहासिक ठरेल, कारण हे आफ्रिकन खंडातील दुसरे पोप असतील.
- पीटर एर्डो (Hungary): वय 72; पुराणमतवादी विचारसरणीचे प्रतीक. पारंपरिक कॅथोलिक मूल्यांचे समर्थक.
- एंजेलो स्कोला (Italy): वय 82; दीर्घ काळापासून पोप पदाचे प्रमुख दावेदार. चर्चमध्ये केंद्रीकरणाचे समर्थक.
पोप निवडीची प्रक्रिया कशी होते?
पोपची निवड शतकानुशतके चालत आलेल्या व्हॅटिकन परंपरेनुसार होते. ८० वर्षांपेक्षा कमी वयाचे कार्डिनल्सचे कॉलेज सिस्टिन चॅपलमध्ये गुप्त मतदान करतात. नवीन पोपची निवड करण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.
पोप निवडण्यासाठी व्हॅटिकनमध्ये Sistine Chapel मध्ये गुप्त मतदान होते. 80 वर्षांखालील कार्डिनल्स दोन-तृतीयांश बहुमताने मतदान करतात. जेव्हा कोणत्याही उमेदवाराला आवश्यक संख्येने मते मिळत नाहीत, तेव्हा मतपत्रिका जाळल्या जातात आणि चिमणीतून काळा धूर निघतो. नवीन पोप निवडला गेला की, पांढरा धूर उठतो आणि संपूर्ण जगाला त्याची घोषणा केली जाते.
नवीन पोपला कशाचा सामना करावा लागेल?
नवीन पोपच्या कार्यकाळात, चर्चला युरोप व उत्तर अमेरिकेतील घटत्या प्रभावाचा सामना करावा लागणार आहे. त्याचबरोबर जागतिक दक्षिणेकडील वाढ, सामाजिक मुद्द्यांवरील मतभेद, आणि नव्या युगातील विश्वासाचे प्रश्न यांवरही त्यांना मार्गदर्शन करावे लागेल.