नागपूर- विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. एप्रिल महिना संपण्याआधीच तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने हवामान खात्याने तीन जिल्ह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, काल सोमवारी विदर्भातील अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा अधिक तीव्र जाणवला. चंद्रपूरमध्ये ४५ अंश, अकोल्यात ४५ अंश, तर अमरावतीमध्ये ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एप्रिलमध्येच उष्णतेचा इतका मोठा कहर पाहायला मिळत असल्याने मे महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः चंद्रपूरमध्ये उष्णतेचा कडाका अधिक जाणवत असून, येथे उष्माघाताचे धोके वाढले आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळेत गरज नसताना घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि थंडावा देणाऱ्या उपायांचा अवलंब करावा,असे आरोग्य तज्ज्ञांनी सुचवले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी रुग्णालयांत उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनांनी आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गावपातळीवरही नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.