Lalit Manchanda Dies | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah), ‘क्राईम पेट्रोल’ आणि अन्य लोकप्रिय मालिकांमधून ओळख मिळवलेले अभिनेते ललित मनचंदा (Lalit Manchanda) यांचा मृतदेह मेरठ, उत्तर प्रदेश येथील त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. रिपोर्टनुसार, पोलिसांनी ही घटना आत्महत्या (Lalit Manchanda Suicide) असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.
२१ एप्रिल रोजी ललित यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवला आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट (Suicide Note) आढळली नाही. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून, घातपाताचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
पोलिस ललित यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांकडून चौकशी करत आहेत. त्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधी माहिती गोळा केली जात आहे. काही जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ललित मागील काही महिन्यांपासून वैयक्तिक तणाव आणि मानसिक अडचणींना सामोरे जात होते.
माहितीनुसार, ललित मनचंदा मुंबईत आर्थिक अडचणींचा सामना करत होते आणि सुमारे सहा महिन्यांपूर्वी ते आपल्या कुटुंबासोबत मेरठला परतले होते.
CINTAA ने व्यक्त केला शोक
CINTAA (Cine and TV Artistes’ Association) ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून ललित मनचंदा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं की, ललित हे 2012 पासून सिंटाचे सदस्य होते.
ललित मनचंदा यांनी अनेक बॉलीवूड चित्रपट (Bollywood Films) आणि टीव्ही शोमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. ‘तारक मेहता…’ मालिकेत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्याशिवाय, ‘सेवंचल की प्रेम कथा’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकांमधूनही त्यांनी आपली अभिनयाची छाप सोडली होती. अलीकडे ते एका वेब सिरीज (Web Series) मध्येही झळकत होते.
नोंद – औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000