Pahalgam Terror Attack | काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोन करून त्यांनी या हल्ल्याला “घृणास्पद” म्हणत भारताला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण समर्थन दर्शवले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत सांगितले, “राष्ट्रपती ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून हल्ल्यात बळी गेलेल्या निरपराध लोकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात अमेरिका भारताच्या सोबत आहे.”
मंगळवारी दुपारी पहलगामजवळील (Pahalgam Terror Attack) एका पर्यटनस्थळी अज्ञात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला असून, बहुतेक मृत पर्यटक हे इतर राज्यांतील होते. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
या घटनेनंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा तात्काळ थांबवत दिल्लीकडे प्रस्थान केले. बुधवारी (23 एप्रिल) सकाळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाविषयक रणनीतीवर चर्चा झाली.
या घटनेवर ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ (Truth Social) अकाउंटवर लिहिलं, “काश्मीरमधील बातमी अत्यंत दुःखद आहे. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आम्ही पीडितांसाठी प्रार्थना करतो आणि पंतप्रधान मोदी यांना आणि भारतातील अद्भुत नागरिकांना आमचा संपूर्ण पाठिंबा आणि सहवेदना आहे.”
भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. वेन्स आणि त्यांच्या पत्नी उषा वेन्स यांनी देखील पहलगाममधील या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. “गेल्या काही दिवसांत, आम्ही या देशाची आणि इथल्या लोकांची सुंदरता पाहून भारावून गेलो आहोत. या भयानक हल्ल्यातील पीडितांसाठी आम्ही प्रार्थना करतो.”
दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहे. या घटनेनंतर उच्चस्तरीय आपत्कालीन बैठक देखील पार पडली.