Ultraviolette Electric Bikes | बंगळूरुस्थित इलेक्ट्रिक मोटरसायकल निर्माता अल्ट्राव्हायोलेटने (Ultraviolette) आता युनायटेड किंगडम (UK) आणि बेनेलक्स (Belgium, Netherlands, Luxembourg) बाजारात अधिकृत प्रवेश केला आहे. या भारतीय कंपनीच्या बाइकला देशात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीने इतर देशात देखील गाड्यांची विक्री सुरू खेली आहे.
मोटोमोंडोसोबतच्या (MotoMondo Partnership) नव्या भागीदारीच्या माध्यमातून कंपनीने आपल्या जागतिक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या भागीदारींतर्गत मोटोमोंडो ही कंपनी युके, बेल्जियम, नेदरलँड्स आणि लक्झेंबर्गमधील अल्ट्राव्हायोलेटच्या इलेक्ट्रिक दुचाकींची अधिकृत आयातदार आणि वितरक म्हणून काम पाहणार आहे.
या भागीदारीची सुरुवात अल्ट्राव्हायोलेटच्या प्रमुख इलेक्ट्रिक मॉडेल – एफ77 मॅक 2 रेकॉनच्या (F77 MACH 2 RECON) युरोपमधील लाँचिंगने होत आहे. ही बाईक £8,499 या ऑन-रोड किमतीत 30 जून 2025 पर्यंत बुक करता येणार आहे. त्यानंतर याची किंमत £9,399 असेल.
अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 10.3 kWh क्षमतेची बॅटरी, 30 kW मोटर आणि तब्बल 323 किमी रेंज असल्याचा दावा कंपनीने केला आहे. शिवाय, यात 10-स्तरीय रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, 5-इंच TFT डिजिटल डिस्प्ले, ऑटो-डिमिंग लाइट्स, हिल होल्ड (hill hold), ड्युअल-चॅनल ABS, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि मल्टी-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत.
ही मोटरसायकल शहरातील वाहतुकीपासून महामार्गावरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही योग्य असल्याने युरोपमधील इलेक्ट्रिक मोबिलिटी (electric mobility) प्रेमींसाठी एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.
मोटोमोंडोचा प्रीमियम ब्रँड्ससोबतचा अनुभव, मजबूत डीलर नेटवर्क आणि स्थानिक बाजारातील जाण यामुळे अल्ट्राव्हायोलेटला त्वरित मार्केट अॅक्सेस आणि विश्वासार्ह आफ्टरसेल्स सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे.
युरोपमध्ये वाढत असलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या पार्श्वभूमीवर, अल्ट्राव्हायोलेटचा हा धोरणात्मक निर्णय ग्राहकांचे आणि उद्योग तज्ज्ञांचे लक्ष वेधण्याची शक्यता आहे.