Pahalgam Terror Attack | पंचायती राज दिनानिमित्त बिहारमधील ( PM Modi in Bihar ) मधुबनी जिल्ह्यात आयोजित शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदींनी उपस्थित हजारो नागरिकांना काही क्षण मौन पाळण्याचे आवाहन केले.
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्येनिष्पाप देशवासियांवर दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला केला. संपूर्ण देश या घटनेने व्यथित झाला आहे. प्रत्येक पीडित कुटुंबाच्या दुःखात देश सहभागी आहे.”
दहशतवाद्यांना उद्देशून पंतप्रधान मोदींनी ठाम शब्दांत इशारा दिला की, “हा हल्ला करणाऱ्यांना आणि त्यामागे असणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडची शिक्षा मिळेलच. आता उरलेल्या दहशतवाद्यांची मातीत मिसळण्याची वेळ आली आहे.”
पंतप्रधान मोदींनी यावेळी देशातील एकतेचे प्रतीक दाखवत सांगितले, “मारले गेलेले काहीजण बंगाली, काही कन्नड, काही मराठी, काही ओडिया, तर काही बिहारचे होते. त्यांचा मृत्यू एकट्या त्यांच्या कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी दुःखद आहे. हा हल्ला पर्यटकांवर नव्हता, तर भारताच्या आत्म्यावर होता.”
शेवटी पंतप्रधान म्हणाले, “भारत आता प्रत्येक दहशतवादी आणि त्यांच्या संरक्षकांना ओळखेल, शोधेल आणि शिक्षा देईल. 140 कोटी देशवासींची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची कंबरड मोडून काढेल.” यावेळी पंतप्रधानांनी इंग्रजीमध्ये भाषण करत एकप्रकारे संपूर्ण जगालाच संदेश दिला.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सरकारने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना त्वरित देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.