Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली महत्त्वाची माहिती

Ukraine Russia War

Ukraine Russia War | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियाला “उच्चस्तरीय चर्चेसाठी” एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तरंजित युद्धाला संपवण्यासाठी दोन्ही देश “कराराच्या अगदी जवळ” असल्याची माहिती देखील त्यांनी

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी रोममध्ये पोहोचल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, “रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चा आणि बैठकांसाठी आजचा दिवस चांगला होता.” त्यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकोफ हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी मॉस्कोला पोहोचले आहेत.

“ते कराराच्या अगदी जवळ आहेत आणि दोन्ही बाजूंनी आता ‘ते पूर्ण करण्यासाठी’ अतिशय उच्च स्तरावर भेटायला हवे,” असे ट्रम्प यांनी लिहिले. “बहुतेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली आहे. आता रक्तपात थांबवा. या क्रूर आणि अर्थहीन युद्धाचा शेवट करण्यासाठी आम्ही जिथे आवश्यक असेल तिथे मदत करण्यासाठी तयार आहोत!”, असेही ते म्हणाले.

त्यापुर्वी एका मुलाखतीत बोलताना “क्रीमिया रशियाकडेच राहील,” असे ट्रम्प यांनी म्हटले होते. युक्रेनवर रशियाचा वेढा कायम असताना, युद्ध संपवण्यासाठी त्यांनी युक्रेनवर सवलती देण्याचा दबाव कसा वाढवला आहे, याचे हे ताजे उदाहरण आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या देशाला अमेरिकेला खनिज संसाधनांमध्ये प्रवेश देणाऱ्या दीर्घकाळ प्रलंबित करारावर त्वरित स्वाक्षरी करावी, अशी मागणीही त्यांनी यापूर्वी सोशल मीडियावर केली होती. मात्र, झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला.

दरम्यान, मॉस्कोच्या पूर्वेकडील बालाशिखा शहरात एका पार्क केलेल्या कारमध्ये घरगुती स्फोटक उपकरण फुटल्याने रशियाच्या एका वरिष्ठ जनरलाचा मृत्यू झाला आहे. देशातील मोठ्या गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या तपास समितीने ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी लेफ्टनंट-जनरल यारोस्लाव्ह मोस्कालिका (Yaroslav Moskalik) यांची ओळख पटवली आहे, जे लष्कराच्या जनरल स्टाफच्या मुख्य परिचालन संचालनालयाचे उपप्रमुख होते.

हा हल्ला, युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईशी संबंधित रशियन व्यक्तींवरील मागील हल्ल्यांसारखाच दिसत आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालाशिखा येथे एका इमारतीच्या बाहेर व्होक्सवॅगन गोल्फ (Volkswagen Golf) कारमध्ये स्फोट झाल्यानंतर त्यांनी प्राणघातक हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे. या घटनेमागे कोण असू शकते, याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.