सिंधूचे पाणी थांबवले तर अण्वस्त्र हल्ला करू! पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची भारताला धमकी


लाहोर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 च्या सिंधुजल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाने बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून सतत चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. आज पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला आज धमकी दिली की, तुम्ही आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमच्यावर अणवस्त्र हल्ला करू. आमच्याकडे 130 अण्वस्त्रे आहेत. ती भारतावर हल्ला करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांचा वापर आम्ही करू.
हनीफ अब्बासी म्हणाले की, तुम्ही आमचे पाणी अडवले तर युद्धासाठी तयार राहा. आम्ही शाहीन, गजनवी आणि घोरीसारखी क्षेपणास्त्रे चौकात शोभेसाठी ठेवलेली नाहीत. ती आम्ही भारतासाठीच राखून ठेवली आहेत. ही शस्त्रे दिखाव्यासाठी नाहीत तर प्रत्यक्ष वापरासाठी आहेत. तुम्हाला कल्पनाही नाही की आम्ही पाकिस्तानच्या कोणकोणत्या भागात ही अण्वस्त्रे तैनात केलेली आहेत. ही शस्त्रे फक्त चौकांमध्ये ठेवलेली नाहीत तर त्यांचा रोख भारताच्या दिशेने आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सीमा ओलांडण्याचा विचारही करू नका. तसे केले तर त्याची मोठी किंमत भारताला चुकती करावी लागेल.
अब्बासी पुढे म्हणाले की, भारत आपल्या सुरक्षेतील त्रुटी मान्य करण्याऐवजी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष देत आहे. इस्लामाबाद त्याच्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही आर्थिक कारवाईला तोंड देण्यास तयार आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारताचा विमान वाहतूक उद्योग अवघ्या दोन दिवसांत अडचणीत आला. भारताला आपली चूक कळली आहे. जर आम्ही 10 दिवस हवाई क्षेत्र बंद ठेवले तर भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत निघतील. अब्बासी यांच्यानंतर मौलाना फजलूर रहमान यानेही भारताला धमकी दिली आहे. मौलाना फजलूर रहमान पाकिस्तानातील जमियत उमेला-इस्लामचा नेता असून त्याने म्हटले आहे की, आम्ही भारतात शिरून उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये चहा पिऊ.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केलेली असताना दहशतवाद्यांची घरे पाडण्याची मोहीम आजही सुरू राहिली. कालपर्यंत 7 दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली होती. आज आणखी तीन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. यात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमदच्या घराचा समावेश आहे. शोपियान जिल्ह्यातील सक्रिय दहशतवादी मोहम्मद शफी दारचे एक घर पाडले होते. आज त्याचा मुलगा अदनान सफी दारचे घर पाडले. अदनान 2024 पासून लष्कर आणि द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) मध्ये आहे. बांदीपोरा येथील अब्दुल अहमद शीर गोजरीचा मुलगा जमील अहमद शीर गोजरीचे घरही स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आले. तोही 2016 पासून सक्रिय दहशतवादी आहे. खासीपोरा त्राल जिल्हा पुलवामा येथील रहिवासी नजीर अहमद वाणीचा मुलगा सक्रिय दहशतवादी अमीर नजीर वाणीचे घरदेखील स्फोटात उद्ध्वस्त झाले. तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असून 2024 पासून दहशतवादी कारवायांत सहभागी आहे.
आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली असून त्यामध्ये आदिल हुसेन ठोकर, अनंतनाग (लष्कर-ए-तैयबा), आसिफ शेख, त्राल (लष्कर-ए-तैयबा), शाहिद अहमद कुट्टे(शोपिया), जाकीर अहमद गनई (कुलगाम,लष्कर-ए-तोयबा),अहसान उल हक, (पुलवामा), आमिर नजीर वानी, (अवंतीपोरा, जैश-ए-मोहम्मद),जमील अहमद शेर गोजरी (बांदीपोरा), आमिर अहमद डार (शोपियां, लष्कर-ए-तोयबा), अदनान साफी दार (जैनपोरा, टीआरएफ), फारूक अहमद तेडवा यांचा समावेश आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात 63 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यात 1,500 हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकट्या अनंतनागमधून सुमारे 175 संशयितांना अटक करण्यात आली आहे. श्रीनगरसह इतर अनेक ठिकाणी दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या लपण्याच्या ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणांनी छापे टाकले आहेत. पहलगाम हल्ल्याचा तपास आतापर्यंत जम्मू-काश्मीर पोलीस करत होते. परंतु आता तो राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआयए) कडे सोपवण्यात आला आहे. एनआयएचे पथक हल्ला झाल्यापासून पहलगाममध्ये असून या प्रकरणाचा तपास करत आहे. आता केंद्र सरकारने अधिकृतपणे संपूर्ण तपास एनआयएकडे सोपवला आहे. एनआयएने स्थानिक पोलिसांकडून या हल्ल्याशी संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती, केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.