Shashi Tharoor on Pahalgam Terror Attack | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताकडून पाकिस्ताविरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत. या घटनेवर आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेची तुलना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी केली आहे.
माध्यमांशी बोलताना थरूर यांनी सुरक्षा यंत्रणांमध्ये काही त्रुटी मान्य केले, मात्र त्यांनी या प्रकरणाकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी याची तुलना 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमासने (Hamas Attack) केलेल्या हल्ल्याशी केली.
“स्पष्ट आहे की, 100% खात्रीशीर गुप्तचर माहिती नव्हती. काही अंशी अपयश आले. आपण पाहिले आहे की इस्रायलसारख्या जागतिक दर्जाच्या गुप्तचर यंत्रणांनाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. इस्रायलने युद्ध संपेपर्यंत जबाबदारी ठरवण्याची घाई केली नाही, तसेच आपल्यालाही हे संकट पार पडल्यानंतर सरकारला जबाबदार धरावे,” असे ते म्हणाले.
थरूर पुढे म्हणाले की, कोणतेही राष्ट्र दहशतवादी हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित नसते. “आपण फक्त अपयशी ठरलेल्या हल्ल्यांविषयी ऐकतो; जे हल्ले रोखण्यात यश मिळते, त्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. काही अपयश झाले, याचे मी समर्थन करणार नाही, परंतु आत्ता त्यावर जास्त लक्ष देणे योग्य नाही,” असेही ते म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात (India Pakistan Tensions) लष्करी कारवाईची मागणी होत आहे. यावर थरूर यांनी सांगितले की, देश एक लष्करी प्रत्युत्तर अपेक्षित करत आहे आणि तो अपरिहार्य आहे.
पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करताना थरूर म्हणाले, “मागील 25 वर्षांपासूनचा अनुभव पाहता, पाकिस्तानने दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, शस्त्र पुरवठा करणे आणि मार्गदर्शन करणे सुरूच ठेवले आहे आणि नंतर प्रत्येक हल्ल्यानंतर जबाबदारी नाकारली आहे. अखेर विदेशी गुप्तचर संस्थांमार्फतही हे सिद्ध झाले आहे.”
त्यांनी उरीआणि पुलवामा हल्ल्यांनंतर भारताच्या केलेल्या लष्करी कारवाईचा संदर्भ देत सांगितले, “उरीनंतर सर्जिकल स्ट्राइक झाले आणि पुलवामानंतर बालाकोट एअर स्ट्राईक झाली. यावेळी या दोन्हीपेक्षा अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.”
तसेच, सिंधू जल करार (Indus Waters Treaty Suspension) थांबवल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी (Bilawal Bhutto-Zardari) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. सिंधू नदीत एकतर आमचे पाणी वाहील अन्यथा भारताचे रक्त वाहील असे ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना थरूर म्हणाले, “हे फक्त भडकाऊ भाषा आहे. पाकिस्तानने समजून घ्यायला हवे की भारतीयांना मारणे इतके सोपे नाही. जर त्यांनी काही केलं, तर रक्त त्यांचंच रक्त जास्त वाहील हे स्पष्ट आहे.”
दरम्यान, काँग्रेस पक्षाने भाजपवर गुप्तचर व सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर अपयशांवरून जोरदार टीका केली असली तरी, दहशतवाद्यांविरोधात सरकारच्या कारवाईला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले आहे.