Rishabh Pant | लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार ऋषभ पंतसाठी आतापर्यंतचा आयपीएल 2025 चा सीझन फारसा चांगला राहिलेला नाही. मागील 10 सामन्यात त्याने केवळ 110 धावा केल्या आहेत. या खराब फॉर्ममुळे आता प्रश्न विचारले जाऊ लागल्यानंतर आता पंतने याबाबत वक्तव्य केले आहे.
लखनौने 27 कोटी रुपये खर्चून विकत घेतलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या चालू हंगामात बॅटने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही पंतची खराब फलंदाजी कायम राहिली आणि लखनौला 54 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पंत डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळायला गेला. मात्र, शॉर्ट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या कर्ण शर्माला त्याने सोपा झेल दिला आणि केवळ 4 धावा करून त्याला पव्हेलियनमध्ये परत जावे लागले.
मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना संपल्यानंतर पंतला टी20 लीगच्या 18 व्या हंगामातील त्याच्या खराब फॉर्मबद्दल विचारण्यात आले. यावर एलएसजीच्या कर्णधाराने उत्तर दिले की, ‘एका व्यक्तीला लक्ष्य करणे योग्य नाही, कारण शेवटी हा सांघिक खेळ आहे.’
पंतने आयपीएल 2025 च्या 10 सामन्यांमध्ये केवळ 110 धावा केल्या आहेत, त्याची सरासरी 12.22 आणि स्ट्राईक रेट 98.21 आहे. त्याचे आकडे 0, 15, 2, 2, 21, 63, 3, 0 आणि 4 असे आहेत.
सामन्यानंतर बोलताना पंत म्हणाला की, “मी गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जास्त विचार करत नाहीये. अशा हंगामात, जिथे गोष्टी तुमच्या बाजूने जात नाहीत, तेव्हा तुम्ही एक खेळाडू म्हणून स्वतःवर प्रश्नचिन्ह उभे करायला लागता, जे तुम्ही करू इच्छित नाही. जेव्हा टीम चांगली कामगिरी करत असते, तेव्हा तुम्ही त्याबद्दल विचार करायला हवा.”
तो पुढे म्हणाला, “अखेरीस, हा एक सांघिक खेळ आहे. हो, एक खेळाडू फरक निर्माण करतो, पण प्रत्येक वेळी जर तुम्ही एका व्यक्तीला बाजूला काढले, तर मला वाटते की ते योग्य नाही.” गेल्या वर्षी पुनरागमन केलेल्या हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी 13 सामन्यांमध्ये 446 धावा केल्या होत्या आणि तीन अर्धशतकेही झळकावली होती.
पंतला गेल्या वर्षीच्या लिलावात एलएसजीने 27 कोटी रुपयांना विकत घेतले होते, ज्यामुळे तो लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, या हंगामात तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. 27 कोटी रुपये आणि पंतचा खराब फॉर्म, यावरून सोशल मीडियावर मीम्स देखील व्हायरल होत आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून झालेल्या या पराभवामुळे एलएसजी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर कायम आहे. त्यांचा पुढील सामना 4 मे रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.