Commonwealth Games Scam | काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांनी कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास 13 वर्षांपासून सुरू असलेला कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यातील (Commonwealth Games Scam) मनी लॉन्ड्रिंगचा खटला अखेर बंद करण्यात आला आहे.
दिल्ली न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचा (Enforcement Directorate – ED) क्लोजर रिपोर्ट स्वीकारत तपास पूर्ण झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणात 2010 च्या क्रीडा स्पर्धांचे प्रमुख सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi), तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत यांच्यासह इतर आरोपींचा समावेश होता.
2010 मध्ये दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात झालेल्या कथित गैरव्यवहारांमुळे देशभरात राजकीय खळबळ उडाली होती. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कलमाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर महत्त्वाच्या कंत्राटांच्या वाटपात अपारदर्शकता व आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा आरोप होता.
या खटल्याचा तपास सुरुवातीला सीबीआयने (CBI) सुरू केला होता, परंतु 2014 मध्ये त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर करून “कोणताही निर्णायक पुरावा सापडला नाही” असे नमूद केले होते. त्यानंतर ED ने मनी लॉन्ड्रिंगचा स्वतंत्र तपास सुरू केला. पण आता, ED चा तपास देखील कोणताही गुन्हा आढळला नाही, असा निष्कर्ष देत न्यायालयाने तोही खटला बंद केला आहे.
न्यायालयाने हा खटला बंद केल्याने सुरेश कलमाडी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळलेला नाही. या प्रकरणात त्यांना क्लिन चीट देण्यात आली आहे.
विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी आदेश देताना सांगितले की, “पीएमएलएच्या (PMLA) कलम 3 अंतर्गत कोणताही गुन्हा घडलेला नाही, त्यामुळे या प्रकरणातील ईसीआयआर (पुढे नेण्याचे कारण राहत नाही. ईडीने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यात येतो.”