Pahalgam Attack: उच्चस्तरीय बैठकीनंतर सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, काहीतरी मोठे घडणार?

Modi Bhagwat Meeting

Modi Bhagwat Meeting | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी काल (29 एप्रिल) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची त्यांच्या नवी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. ही बैठक पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) झाली असून दोघांमध्ये देशातील संरक्षण आणि सुरक्षिततेबाबत गंभीर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

या भेटीआधी पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठक घेऊन हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पर्यायांवर चर्चा केल्याचे सांगितले जाते. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटक मारले गेले. हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांतील तणाव (India Pakistan tensions) अधिक वाढले आहेत.

गेल्या आठवड्यात मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केंद्र सरकारने या हल्ल्याचा कठोर प्रतिकार करावा, अशी मागणी केली होती. “धर्म विचारून लोकांना मारले गेले, हे हिंदूत्वाचे लक्षण नाही. आम्ही रागात आहोत आणि ठोस कारवाईची अपेक्षा करतो,” असे ते म्हणाले होते. त्यांनी पंतप्रधानांचे थेट नाव न घेता स्पष्ट केले की, नागरिकांचे रक्षण हे ‘राजाचे कर्तव्य’ आहे.

रिपोर्टनुसार , या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला पूर्ण कार्यकारी स्वातंत्र्य (operational freedom) देण्याचा निर्णय घेतला. या बैठकीस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच तिन्ही दलांचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, आणि एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध भारताची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. भारतीय सशस्त्र दलांवर (Indian Armed Forces) आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले आणि भारताने कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे, याची पद्धत, लक्ष्य आणि वेळ निवडण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सांगितले.

दरम्यान, सरकारने हल्ल्याचे सूत्रधार आणि त्यांच्या सहाय्यकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून, पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर सिंधू जल करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचाही निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लष्कराला आदेश! हल्ला करा! संपूर्ण मुभा! योग्य वेळ! लक्ष्य आणि पद्धत तुम्ही ठरवा

Share:

More Posts