Canada PM Mark Carney | कॅनडात लिबरल पार्टीने (Liberal Party) अनपेक्षित विजय मिळवत सलग चौथ्यांदा सत्ता काबीज केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Canada New PM Mark Carney) हे पुन्हा पंतप्रधान झाले आहेत. सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यापासून दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी हा विजय मिळवला आहे.
एकेकाळी बँकर असलेल्या कार्नी यांनी मार्चच्या मध्यात लिबरल पार्टीची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने संसद विसर्जित करत निवडणुकीची घोषणा केली होती.
ही निवडणूक कॅनडाच्या दशकांतील सर्वात महत्त्वपूर्ण निवडणुकांपैकी एक मानली गेली. कार्नी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उघडपणे टीका केली होती, त्यामुळे ही निवडणूक ट्रम्प यांच्यावरील जनमत चाचणी मानली जात होती. यात कार्नी यांनी कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे (Conservative Party) प्रमुख पियरे पोइलिव्हरे यांचा पराभव केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मार्क कार्नी यांचे कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.
कार्नी आणि लिबरल पार्टीचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, “आमची भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि आमच्या लोकांसाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.” ते पुढे म्हणाले, “भारत आणि कॅनडा हे सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या नियमांसाठी असलेली दृढ बांधिलकी आणि लोकांच्या परस्पर संबंधांनी जोडलेले आहेत.”
कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी कोण आहेत? (Who is Mark Carney?)
मार्क कार्नी यांचा जन्म 16 मार्च 1965 रोजी फोर्ट स्मिथ, नॉर्थवेस्ट टेरिटरीज येथे झाला. त्यांनी 2008 ते 2013 दरम्यान बँक ऑफ कॅनडा आणि 2013 ते 2020 दरम्यान बँक ऑफ इंग्लंडचे नेतृत्व केले. 1694 मध्ये स्थापन झालेल्या बँक ऑफ इंग्लंडचे नेतृत्व करणारे ते पहिले गैर-ब्रिटिश प्रमुख होते. 2008 च्या आर्थिक संकटात कॅनडाची अर्थव्यवस्था टिकवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
2020 पासून ते संयुक्त राष्ट्रांचे हवामान व वित्त विषयक विशेष दूत म्हणून काम करत होते. ते गोल्डमन सॅक्सचे (Goldman Sachs) माजी कार्यकारी असून त्यांनी लंडन, टोकियो, न्यूयॉर्क आणि टोरंटो येथे 13 वर्षे काम केले आहे.
राजकारणाचा कोणताही पूर्वानुभव नसतानाही कार्नी यांनी अतिशय कमी वेळात देशाचे नेतृत्व आपल्या हाती घेतले आहे. हार्वर्ड विद्यापीठातून 1988 मध्ये अर्थशास्त्रात पदवी आणि ऑक्सफर्डमधून पदव्युत्तर व डॉक्टरेट मिळवलेली आहे. ते एकेकाळी हार्वर्डसाठी आइस हॉकी संघाचे बॅकअप गोलकीपर होते. सध्या त्यांच्याकडे कॅनडा, युनायटेड किंगडम आणि आयर्लंडचे नागरिकत्व आहे, मात्र राजकीय दृष्टिकोनातून ते फक्त कॅनडाचे नागरिकत्व कायमस्वरूपी स्वीकारण्याचा विचार करत आहेत.