Kolkata Hotel Fire : कोलकातामध्ये भीषण अग्नितांडव, हॉटेलला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू, तपास सुरू

Kolkata Hotel Fire

Kolkata Hotel Fire | कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे

पोलिस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी माहिती दिली , ही घटना 29 एप्रिलला रात्री 8:15 च्या सुमारास ‘रितुराज हॉटेल’ मध्ये घडली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. रात्री 1 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

“आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि बचावकार्यादरम्यान अनेक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या तपासासाठी एक विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे,” असे वर्मा यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे भाजप अध्यक्ष सुकांत मुझुमदार यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी राज्य प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा उपायांचे कठोर पालन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे, “मी राज्य प्रशासनाला तातडीने बाधित लोकांची सुटका करण्याचे, त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय आणि मानवतावादी मदत पुरवण्याचे आवाहन करतो. यासोबतच, भविष्यात अशा दुःखद घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा उपायांचा सखोल आढावा घेण्याची आणि त्यांचे कठोर निरीक्षण करण्याची विनंती करतो.”

पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सुभंकर सरकार यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कोलकाता महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सरकार म्हणाले, “ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आग लागली. अनेक लोक अजूनही इमारतीत अडकलेले आहेत. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. महामंडळ काय करत आहे, हे मला समजत नाही.”

या दुर्घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वना दिली जात आहे. प्रशासन आता या घटनेच्या कारणांचा आणि सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास करत आहे.