पाकिस्तानवर हल्ल्याची भारताची रणनीती तयार झाली! पंतप्रधान मोदींच्या सलग 6 बैठका! सरसंघचालकही भेटले

नवी दिल्ली- पहलगामवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला भारत तोडीस तोड प्रत्युत्तर देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून संपूर्ण भारत देश त्या क्षणाची वाट पाहत आहे. आज त्या दिशेने अत्यंत महत्त्वपूर्ण वेगवान हालचाली झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11 वाजल्यापासून सहा महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. त्याचबरोबर प्रथमच सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाले.
पाकिस्तानचे माहिती प्रसारणमंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी आज पहाटे दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, पुढील 24 ते 36 तासांत भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. पाकिस्तानी नेते व मंत्र्यांची ही चलबिचल सुरू असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11 पासून त्यांच्या निवासस्थानी सलग सहा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये पाकिस्तानवर हल्ला करण्याची आणि पाकिस्तानची व्यापार कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे निर्णय अर्थातच गुप्त राखण्यात आले आहेत.
आज पहिल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तीनही दलाचे प्रमुख अनिल चव्हाण, सल्लागार अजित डोवल, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी.सिंग हे उपस्थित होते. या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींशी स्वतंत्र चर्चा केली. ही चर्चा संपत नाही तोवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत हे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले. सरसंघचालकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी येण्याचीही पहिलीच वेळ आहे. मोहन भागवत आणि पंतप्रधान यांच्यात दीड तास चर्चा झाली.
आजच्या दिवसात कॅबिनेट सुरक्षा कमिटी बैठक, आर्थिक विषयक समितीची बैठक, कामकाज समितीची बैठक, सुरक्षाविषयी समितीची बैठक झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या सदस्यांना बदलून रॉ या गुप्तहेर खात्याचे निवृत्त अधिकारी अलोक जोशी व इतर सहा जणांची नव्याने नेमणूक करण्यात आली. या सर्व बैठकांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातच पाकिस्तानवर व्यवहार निर्बंध टाकण्याबाबतही चर्चा झाली. पाकिस्तानहून भारतात फळे, सुकामेवा, मसाले इतकेच येते. मात्र भारताकडून पाकिस्तानला साखर, औषधे, खत अशा महत्त्वाच्या वस्तू पुरवते. या निर्याती स्थगित करण्याबाबत उहापोह झाला.
दरम्यान पाकिस्तानने काल रात्रीही भारताच्या सीमेवर गोळीबार केला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त गोळीबार केला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राशी संपर्क साधून भारताला आवर घालण्याची विनंती केली. इंग्लडच्या हार्वर्ड विद्यापीठात पाकिस्तानी मंत्री औरंगजेब यांचे भाषणही झाले. या सर्वाला प्रत्युत्तर देत भारताने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरूच ठेवला. कुपवाडा येथे जोरदार तपास केला. पहलगाम हल्ल्याशी संबंधित लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित फारुख अहमद या अतिरेक्याचे काश्मीरमधील घर काल तोडले. आज त्याचा शोध घेऊन तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपल्याचे उघडकीस आले आहे. पाकिस्तानची चारही बाजूनी कोंडी करण्याची कारवाई सुरू आहे.
भारत 36 तासांत हल्ला करील! पाक मंत्र्याची पहाटे 2 वाजता प्रेस
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी आज पहाटे 2 वाजता तातडीची पत्रकार परिषद घेतली. भारत येत्या 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो,असा दावा त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. तरीदेखील भारत या हल्ल्याबद्दल आम्हाला जबाबदार ठरवत आहे. जगभरात पाकिस्तानची बदनामी करून लष्करी कारवाई करायची असे षड्यंत्र भारताने आखले आहे. भारतच आरोप करतो आणि स्वतःच न्याय देण्याची भाषा करतो. पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यामुळे स्वतः त्रस्त असताना आम्ही दुसऱ्या देशात कारवाया का करू? तरीही येत्या 24 ते 36 तासांत भारत आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. या हल्ल्याला तोंड देण्यास आम्ही समर्थ आहोत. भारताने हल्ला केला तर आम्ही निर्णायक उत्तर देऊ, असे तरार म्हणाले.

Share:

More Posts